Thursday, June 13, 2019

June : My favorite month of the year




June is my favorite month of the year. Here is a post in Marathi written earlier on June 12th, 2015 on my wordpress blog.

जून महिना हा माझा आवडता महिना आहे.  त्याचं मुख्य कारण म्हणजे … फणस पिकायला खरी सुरवात होते ती जून महिन्यात येणार्या ज्येष्ठ मासात !  अजून एक कारण म्हणजे कोकणात “अंतू शेठ” बरोबर होणारी  वार्षिक भेट आणि होणार्या चर्चा … आप्तेष्ठांचे वार्षिक स्नेह संमेलन … नानू , नाथा , गजा , बबडू , परांजप्या, गोखले आणि हमखास भेटणारे चितळे मास्तर !

जून महिना मला तसा वर्षातला सर्वात महत्वाचा महिना हि वाटतो.. कारण वर्षा च्या मध्यावर , पूर्वार्धा कडे  मागे वळून हि पहाता येतं आणि उत्तरार्धा ची आखणी हि करता येते !

मराठी साहित्या च्या दृष्टी नी मात्र जून महिन्याला  एक कारुण्य आणि उदासीनते ची किनार आहे .. त्याचं कारण हि तसंच आहे.. अनेक  प्रसिद्ध मराठी साहित्यिकानी ह्या जून महिन्यातच जगाचा निरोप घेतला … अभिजात मराठी साहित्य आणि संगीतातील अनेक  नामवंतांची पुण्यतिथी ह्या जून महिन्यातंच !

जून १ १९३४ – श्रीपाद कृष्ण कोल्हटकर , नाटककार आणि विनोदी लेखक
.
१९९८ – गो.नी. दांडेकर , मराठी कादंबरीकार

जून ४  १९१८ – गोविंद वासुदेव कानिटकर, मराठी साहित्यिक

जून ५  १९८७ – ग. ह. खरे , भारतीय इतिहासतज्ञ.

जून ६  २००२ – शांता शेळके , मराठी कवियत्री.

जून ७  १९९२ – डॉ. स. ग. मालशे, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक

जून ११ १९५० – पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी, बालसाहित्यिक, स्वातंत्र्य सैनिक

जून १२ २००० – पु. ल. देशपांडे , मराठी मनावर दीर्घ काळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे लेखक, कवी, नाटककार, अभिनेता (चित्रपट, रंगभूमी), दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार.

जून १३  १९६९ – प्रल्हाद केशव अत्रे, मराठी लेखक , पत्रकार, संपादक, राजकारणी, शिक्षणतज्ञ, नाटककार, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक व प्रभावी वक्ते.

जून १७  १८९५ – गोपाळ गणेश आगरकर , समाजसुधारक, विचारवंत.

जून २०  १९९७ – वासुदेव वामन पाटणकर ऊर्फ भाऊसाहेब पाटणकर, मराठीतील प्रथम शायर

जून २६  २००१ – वसंत पुरुषोत्तम काळे, मराठी साहित्यिक  ( व पु )

... अखेर जून महिन्यात संगित नाटक क्षेत्रातील एका उत्तुंग तारया ची जयंती हि आहे … जून २६  .. बालगंधर्व नारायण श्रीपाद राजहंस ! 

अभिजात मराठी साहित्याला एक अभूतपूर्व लोकप्रियता मिळवून देणार्या .. व पु , प्र के अत्रे , गदिमा आणि पु ल ह्या साहित्यिकांनी मला मराठी साहित्या ची गोडी लावली  ..  १२ जून हि पुलं ची पुण्यतिथी , म्हणून हि ब्लॉग पोस्ट आज टाकावीशी वाटली !

जन्म आणि मृत्यू ह्या विषया वर चार ओळी, जे एक अमर गीत म्हणून आपल्याला माहित आहे ...आरती प्रभू ,भास्कर चंदावरकर आणि रवींद्र साठे, यांनी या गीता ला अमरत्व दिलं आहे .. माझं  सर्वात आवडतं गाणं  ...

अंत झाला अस्ताआधी,
जन्म एक व्याधी, 
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी
देई कोण हळी, त्याचा पडे बळी आधी,
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे !



युट्यूब वर "कुणाच्या खांद्यावर" ची माझी प्लेलीस्ट 


 -------------------------------------------------------------------------

“जन्म आणि मृत्यु ह्या दोन टोकांच्या मधे पकडून नियतीने चालवलेली आपणा सा‍र्‍यांची फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणार्‍या माणसांची ‘हसवणूक’ करण्यापलीकडे आणखी काय करायचं? ”

– पु.ल  (प्रस्तावना : हसवणूक)