Wednesday, December 19, 2018

सवाईत ले "सवाई"


सवाई गंधर्व संगीत महोत्सव हा पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा आणि अभिमाना चा विषय आहे. हा उत्सव जरी शास्त्रीय संगीताचा असला तरी चोखंदळ पुणेकर हक्काने अगदी भक्तिभावाने आपलं “पुणेकर” म्हणून एक कर्तव्य म्हणून हजेरी लावतो. अनेक वेळा नक्की कोण कलाकार गातोय ( अस्सल पुणेरी भाषेत ..कोकलतोय ) , काय गातोय , कुठला राग वैगरे काहीही माहित नसेल ..किंबहुना गाणे संपल्यावर हि  “हा मगाशी गाणारा कोण होता ?” असा भाबडा प्रश्न हि विचारायला काही जण कमी करत नाहीत . पण एक
नक्की, कि गाणं चांगलं झालं कि भरभरून कौतुक हे चोखंदळ पुणेकर सवाई रसिक नक्की करतात .. एक वेळ “शास्त्रीय” माहिती नसेल हि कदाचित पण गाणं चुकलं कि ह्या सवाई पुणेकरांना लगेच लक्षात येते .. आणि चांगलं झालं तर नक्कीच दाद मिळते !

सवाई हा फक्त एक उत्सवच नाही तर महोत्सव आहे .. एक जलसा .. एक जत्रा जिथे गेल्यावरच तिचा आनंद अनुभवता येतो ! तर अश्या ह्या आमच्या पुण्याच्या सवाई चे किती गावे गुण आणि किती करू कवतिके असे पुणेकरा ला होणे सहाजिक आहे ..ह्या सवाई वर रसिक कविता करतात , लेख लिहितात (तुम्ही तो वाचताय !), ओव्या ,अभंग ह्यांची हि बरसात सवाई वर होते. गेल्या काही वर्षात जरी सवाई ला एका “इवंन्ट” (Event) चं रूप आलं असलं तरी त्याचा “खाणे आणि गाणे” ह्या साठी रसिकांची पंढरी म्हणून लवाजमा अजून तरी उत्साहात गाजतोय.
सवाई च्या "कथा आणि व्यथा" एका बाजूला असल्या तरी इथले “नमुने” हे सुद्धा एक वार्षिक पर्वणी होऊन येतात ..

"रेकॉर्डर काका"
ह्यांचं काम एकच .. प्रत्येक गाणं-वाजवणं रेकॉर्ड करून मित्रांना पाठवणे .. WA ग्रुप्स , फेसबुक ग्रुप्स वर टाकणे ह्यात त्यांना आनंदच नाही तर अभिमान असतो .. एखाद्या संगीताच्या WA ग्रुप चे हे हमखास Admin असतात आणि ग्रुप मेंबर वाढवण्या साठी त्यांचे marketing - sales हि चालू असते.

सेल्फी स्टार्स
सगळीकडे सेल्फी घेण्या साठी यांचा जन्म झालेला आहे. हे आता सर्वत्र आढळतात. सवाई च्या सेल्फी स्टार्स चं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या सेल्फी मधे मागे दुसरा सेल्फी स्टार हि दिसतो .. जाकीट हवंच !

"बर्ड वॉचर्स"
शिक्षणाचे माहेरघर असल्या मुळे पुण्यातल्या अनेक कॉलेजेस मधील तरुण ह्या वर्गात मोडतात. ह्यांची संख्या मोठी आहे आणि दिवसन दिवस वाढत आहे. सवलतीच्या दरातील पासेस मुळे युवकांची ५ दिवसाची "सोय"होत असते.. कधी-कधी गाठी जमून हि जातात हे वेगळे सांगायला नको

"खादाड"
गाण्या पेक्षा खाण्या-पिण्या कडे ह्यांचे लक्ष असते. बायकोला गाणं आवडतं म्हणून तिच्या बरोबर आलेले अनेक नवरे ह्या वर्गांत मोडतात. त्यांची सोय सवाई ला नेहमीच चांगली असते त्या मुळे ते नेहमी "सवाई fan" म्हणून वावरतात.


"संगीत "विशारद"  
यांचा मुख्य उद्देश "राग ओळखणे" व आसपास च्या लोकांना कॉमेंटरी करत रहाणे हा असतो. त्यांचा आसपास च्या लोकांना त्रास होत असावा पण त्यांना सहन केलं जातं .. ह्या विशारदा कडून प्रेरणा घेऊन पुढच्या वर्षी आसपास बसलेला एखादा किंवा एखादी पुढच्या वर्षी "विशारद" पणा करण्याचा निश्चय करते

अतृप्त "रसिक"
हे लोकं नेहमी अगदी मागे उभे असतात , उभे राहूनच रोज एक दोन मैफिली ऐकतात. ह्यांना "सवाई" तला  चहा सुद्धा चांगला वाटत नाही, गाणं तर नाहीच नाही .. "गेल्या वर्षी किंवा "भीमाण्णा" होते त्या सारखा सवाई आता राहिला नाही" हे वाक्य दर १० मिनटांनी ते येणार्या जाणार्या ला सांगायला चुकत नाहीत. त्यांच्या बरोबर आलेला एखादं ७-८ वर्षाचं पोर हि हे काम चालू ठेवतात.
असं असलं तरी हे "रसिक" दर वर्षी सवाई ला हजेरी मात्र लावता तच !

संगीत समीक्षक ( फेसबुक कृपा )
सवाईत ला सर्वात वेगाने वाढणारा वर्ग म्हणजे हा समीक्षक वर्ग. रोज फेसबुक , WA वर व अन्य सोशलमिडीया-ब्लॉग्स  वर रोज सवाई च्या मैफिली बद्दल लिहिणे हाच ह्यांचा सवाई ला येण्याचा मुख्य उद्देश. गायक वादकांनी काहीही आणि कसेही असले तरी रोज नवे-नवे मराठीतले शब्द ,रंगवून - फुलवून प्रत्येक गायक वादका ची प्रशंसा .. "सुरात न्हाऊन निघणे", "सिंहगर्जना",
"सुरांचा नाजूक आविष्कार" , "स्वरमयी उत्तुंग चिदानंद रुपी अनुभव" इत्यादी गोष्टी ह्यांना "च" लिहिता येतात. हे घरी बसून हि असे लेख लिहू शकतात (किंबहुना अनेक लेख आधीच लिहून तयार असतात ! ) .. दर रोज फेसबुक वर "likes" मिळवणे हा ह्यांचा मुख्य "सत्चिदानंद" असतो.

"पहिलट" कर किंवा करीण
बाहेरगावाहून पुण्यात फक्त सवाई साठी आलेले , पुण्यात नोकरी ला लागलेले परप्रांतीय ,"Software"- IT वाले (त्यात काही सेल्फी स्टार्स हि आले ) , रिटायर झाल्या मुळे आता तरी सवाई ला जायला हवं म्हणून येणारे , व काही पुण्यातलेच "चला एखाद दिवस संध्याकाळी जाऊन बघू तरी हा काय प्रकार आहे" म्हणून आलेले. ह्यात एक मुख्य वर्ग म्हणजे "संगीत" शिकायला सुरुवात केलेले "विद्यार्थी".. हे बहुतेक "इंजिनियर असतात आणि त्यांनी अजून ठरवलेलं नसतं कि गायक-वादक व्हायचं का फोटोग्राफर , पुढच्या वर्षी हे वेगळ्या वर्गात जागा मिळवतात !
  
"फोटोग्राफर"
हि फोटोग्राफर मंडळी फार धूर्त असतात .. गाणाऱ्यांच्या फक्त भावमुद्रांचे फोटो काढतात. जेवढ्या उड्या , हातवारे , वाकडे तिकडे चाळे वैगरे हे गायक लोकं करतील तेवढं यांना आवडतं .. विचित्र खाकरणे ,खोकला काढणे , विचित्र आवाज , किंचाळ्या  वैगरे गोष्टी ऐकण्याच्या भानगडीत मात्र हे पडत नाहीत, किंबहुना गाणं हे त्यांच्या साठी ऐकण्याची गोष्टच नाहीये .. फक्त लेन्स लावून फोटो काढत इकडे-तिकडे फिरायचे आणि नंतर त्या फोटोंचे प्रदर्शन भरवायचे , फेसबुक इन्स्टाग्राम वर अपलोड ..शिवाय ह्यांना आता जियो च्या फुकट 4G ची साथ मिळाल्या मुळे काही विचारायची सोय नाही .. फोटो बरोबर , विडीयोज आणि आता युट्यूब चॅनल हि !!

हे खरे सवाईत ले "सवाई"  लोकं आहेत ! 




--------------------------------------------------------------

References :
PraBhaaVi ( प्रभा वि ) 
सवाई fan page